7.00 PM : गुवाहाटीमधील परिस्थिती जवळपास आटोक्यात; सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मात्र अजूनही विस्कळीत..
6.30 PM : पश्चिम बंगालमधील रेल्वेसेवा ठप्प..
6.00 PM : ईशान्य सीमेवरील १०६ रेल्वे रद्द..
6.00 PM : दिल्लीतील मेट्रोसेवा पूर्ववत; आंदोलनाच्या पार्श्वभूमीर खबरदारीचा उपाय म्हणून केली होती बंद..
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत पास झाले आहे. मात्र, या विधेयकाला विरोध करत दोन दिवसांपासून संपूर्ण ईशान्य भारत रस्त्यावर उतरला आहे. आसाममध्ये सुरु झालेल्या या आंदोलनाचे लोण आता पश्चिम बंगालमध्येही पोहोचले असून, बेलदंगा रेल्वे स्थानकाला आंदोलकांनी पेटवल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कोरोमंडल एक्सप्रेसला हावडामधील उलुबेरिया स्थानकाजवळच थांबवण्यात आले आहे. तर, दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
कॅबविरोधी आंदोलनाचे लोण पश्चिम बंगालमध्येही पसरले.. पश्चिम बंगालमधील कॅबविरोधी आंदोलनांमुळे दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.. आसाममधील बळींचा आकडा चारवर..
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी ईशान्येकडील राज्यांमध्ये जाळपोळ, आंदोलने, रॅली आणि जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. या आंदोलनावेळी पोलीस गोळीबारात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक दिपांजल दास हा गुवाहटीमधील आर्मी कॅन्टीनचा कर्मचारी होता. दिपांजल दाससह आणखी दोघांचा काल मृत्यू झाला होता. तर, आज आणखी एका आंदोलनाला आपला जीव गमवावा लागला आहे.
शाहांचा शिलाँग दौरा रद्द, तर अॅबेंचा भारत दौरा पुढे ढकलला..
ईशान्य भारतात सुरु असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शिलाँग दौरा रद्द करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांचा पूर्वनियोजित भारत दौराही पुढे ढकलल्याची माहिती मिळत आहे.
इंटरनेट बॅन आणि संचारबंदी दोन दिवसांसाठी वाढवली..
आसामधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आलेली इंटरनेट आणि संचार बंदी ही ४८ तासांसाठी वाढवण्यात आली आहे.
संचारबंदीचा आदेश झुगारून गेल्या दोन दिवसांपासून नागरिक विधेयकाच्या विरोधात आंदोलन करत आहेत. आसामधील शाळा महाविद्यालये कालपासून तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. आसामधील दहा जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आंदोलनामुळे ढासळली आहे. स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनामुळे ईशान्येकडील राज्यांमधील जनजीवन ठप्प झाले आहे. मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.