महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'सीएए माघारी घेणार नाही, ज्यांना आंदोलन सुरू ठेवायचंय ते सुरू ठेवू शकतात' - सीएए आंदोलन

सीएए कायदा देशातील नागरिकांबाबत अजिबात नाही. मात्र, विरोधक नागरिकांमध्ये खोटी माहिती पसरवत आहे. देशातील नागरिकांचे नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद या कायद्यामध्ये नाही - अमित शाह

amit saha
अमित शाह रॅलीत बोलताना

By

Published : Jan 21, 2020, 4:39 PM IST

लखनौ - सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) देशातील विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहे. या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे वक्तव्य केले आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा माघारी घेतला जाणार नाही, ज्यांना आंदोलन करायचे आहे, ते आंदोलन सुरू ठेवू शकतात, असे शाह म्हणाले. लखनौमध्ये या कायद्याविषयी आयोजित जनजागृती अभियानामध्ये ते बोलत होते.

सीएए कायदा देशातील नागरिकांबाबत अजिबात नाही. मात्र, विरोधक नागरिकांमध्ये खोटी माहिती पसरवत आहे. देशातील नागरिकांचे नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद या कायद्यामध्ये नाही. काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस नागरिकांची दिशाभूल करत आहे, असे शाह म्हणाले.

भारताच्या फाळणीवेळी हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन धर्मीयांची बांगलादेशातील लोकसंख्या ३० टक्के होती. तर पाकिस्तानात २३ टक्के होती. तर आता बांगलादेशात ७ टक्के आणि पाकिस्तानात ३ टक्के राहिली आहे, बाकीचे नागरिक कुठे गेले? असा प्रश्न शाह यांनी सीएए विरोधी आंदोलनकर्त्यांना विचारला.

यावेळी त्यांनी ५ जानेवारीला जेएनयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचारावरही वक्तव्य केले. 'ज्यांनी भारत मातेचे हजार तुकडे करण्याच्या घोषणा दिल्या त्यांना तुरुंगात टाकायला पाहिजे की नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. जर तुम्ही भारतविरोधी घोषणा देत असाल तर तुम्हाला मी तुरुंगात टाकेन', असे शाह म्हणाले. राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आणि मायावती यांना सीएए कायद्यावर बोलण्यास खुले आव्हान शाह यांनी दिले. तीन महिन्यांच्या आत भव्य राम मंदिर उभारण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details