लखनौ- बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी समाजवादी पक्षासोबतच्या युतीबाबत त्यांचा निर्णय स्पष्ट केला आहे. मायावतींनी ट्विटरवर माहिती देताना लिहिले आहे, की पक्षाच्या निर्णयानुसार येथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुका बसप स्वबळावर लढणार आहे.
मायावतींनी समाजवादी पक्षासोबत असलेल्या युतीबाबत लिहिले, की लोकसभा निवडणुकीनंतर सपाचा व्यवहार आम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडत होता. सपाच्या वर्तनामुळे यापुढील निवडणुकात भाजपला हरवणे शक्य होणार नाही. त्यामुळे बसपने आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी मायावतींनी पोट निवडणुकील ११ जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यावेळी मायावतींनी सपासोबतची युती कायमची तुटली नसल्याचे सांगितले होते. लोकसभा निवडणुकीत सपा-बसप आणि आरएलडी यांनी युती केली होती. सपा-बसपाने प्रत्येकी ३८ तर, आरएलडीने ४ जागांवर निवडणुक लढवली होती. निवडणुकीत युतीला फक्त १५ जागाच जिंकता आल्या. यामध्ये बसपाने १० तर, सपाने ५ जागा जिंकल्या होत्या. आरएलडीला एकही जागा जिंकता आली नव्हती.
मायावतींनी ट्विट करत लिहिले, की काल लखनौ येथे बसपाची बैठक झाली. अडीत तास चाललेल्या या बैठकीत राज्यानुसार चर्चा करण्यात आली. यानंतर, हा निर्णय घेण्यात आला.