नवी दिल्ली -देशभरातील बीएसएनल कर्मचारी संघटनांनी आज (सोमवार) देशव्यापी उपोषणाचा इशारा दिला आहे. बीएसएनएल कंपनी ही इच्छानिवृत्ती घेण्यासाठी कर्मचाऱ्यांवर मानसिक दबाव आणत असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.
बीएसएनएलचे अर्ध्याहून अधिक कर्मचारी या संघटनांमध्ये सहभागी आहेत. त्यांचा आरोप आहे, की कंपनी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांवर इच्छानिवृत्ती योजनेमध्ये (व्हीआरएस) सहभागी होण्यासाठी दबाव आणत आहे. तसे न केल्यास, कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय हे ५८ वर्षांपर्यंत कमी करण्याच्या, आणि लांबवर बदली करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप या कर्मचारी संघटना करत आहेत.
व्हीआरएससाठी नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन कम्युटेशन मिळणार नाही. याद्वारे, कर्मचाऱ्यांना साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर १५ वर्षांपर्यंत मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेचा एक तृतियांश भाग आगाऊ मिळणार होता. कर्मचाऱयांचे असे म्हणणे आहे, की काही वर्षांपूर्वी बँकांकडे यापेक्षा चांगल्या योजना मिळत होत्या. बीएसएनएलची ही योजना कर्मचाऱ्यांसाठी म्हणावी तितकी उपयोगी नाही.