लंडन - कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले आहे. आत्तापर्यंत जगभरामध्ये जवळ जवळ ८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये तर चीनच्या वुहान प्रांतापेक्षाही बिकट परिस्थिती झाली आहे. एका दिवसात ३०० पेक्षा जास्त रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत साडेसहा हजार नागरिकांना लागण झाली असून ११२ जण दगावले आहेत. तर इंग्लडमध्ये १ हजार ९५० जणांना कोरोनाची लागण झाली असून ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इंग्लमधील अभ्यासकांचा धक्कादायक अहवाल समोर आला असून त्यामुळे तेथील सरकारने कडक निर्बंध जारी केले आहे.
कोरोना विषाणूमुळे अमेरिका आणि इंग्लडमध्ये लाखो जणांचा मृत्यू होणार असल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. नील फर्ग्युसन हे लंडनमधील इंपिरीयल कॉलेजमध्ये मॅथॅमॅटिकल बायोलॉजी या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या टीमने हा अभ्यास केला आहे. त्यानुसार, अमेरिकेत कोरोनामुळे २२ तर इग्लंडमध्ये ५ लाख कोरोनामुळे दगावणार असल्याचे म्हटले आहे. इटलीमधील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास करून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.