नवी दिल्ली - ‘ऑनलाईन तिकिट बुकिंग प्लॅटफॉर्म बुकमायशो’ने त्यांच्या 270 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले किंवा अनिश्चित काळासाठी रजेवर पाठवले आहे. कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे येत्या काही महिन्यात ऑनलाईन तिकिटे बुक करण्याचे प्रमाण कमी होईल आणि यामुळे कंपनीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी शक्यता आहे. यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
ओला, उबेर, झोमॅटो, स्विगी अशा तंत्रज्ञानाच्या आधारावर चालणाऱ्या अनेक व्यावसायिक कंपन्यांचीही अशीच स्थिती आहे. या कंपन्यांनी त्यांच्या शेकडो कर्मचाऱ्यांना मागील काही आठवड्यात कामावरून कमी केले आहे. सध्या त्यांच्या व्यवसायासाठी अनिश्चित वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.
“आम्हाला आमच्या खर्चाचे प्रमाण कमी करावे लागेल. येत्या काही महिन्यात कंपनीच्या कमाईत घट होणार आहे. बुकमायशो कंपनीत भारतासह जगभरात 1 हजार 450 कर्मचारी काम करतात. त्यापैकी वेगवेगळ्या टीम आणि इतर कामे करणाऱ्यांपैकी साधारण 270 कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला आहे,' असे बुकमायशोचे मुख्य कार्यकारी आशिष हेमराजानी यांनी कर्मचार्यांना ईमेलद्वारे सांगितले.