नवी दिल्ली -सात वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली आहे. तिहार तुरुंगात चारही दोषींनी आज पहाटे ५.३० ला फाशी देण्यात आली. त्यांनतर चौघांचे मृतदेह दिनदयाल उपाध्याय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत.
तिहार तुरुंगातून मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. चौघांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन तुरुंग प्रशासन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसार करण्यात येणार आहे. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात येणार आहेत. मात्र, मृतदेहांवर अंत्यसस्कार करताना कसलेही प्रदर्शन न करण्याचे कुटुंबीयांकडून लेखी लिहून घेण्यात आले आहे. यावेळी रुग्णालयात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात आली. त्यामुळे पीडितेसह कुटुंबीयांना सात वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. फाशी देण्याच्या काही तासांपूर्वी दोषींच्या वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. पहाटे अडीच ते सव्वा तीन वाजेपर्यंत सुनावणी घेण्यात आली. यात फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. मात्र, ती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली होती.
शेवटी आमच्या मुलीला न्याय मिळाला. आज मी समाधानी आहे. कारण, संपूर्ण देशाला या घटनेनंतर शरमेनं मान खाली घालावी लागली होती. आज संपूर्ण देशाला न्याय मिळाला आहे. अशी प्रतिक्रीया निर्भयाच्या आईने व्यक्त केली आहे.