तिरुवनंतपुरम - कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातील नेते रामदास आठवले यांनी 'गो कोरोना गो' चा जयघोष केल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. परंतु देशाच्या दक्षिणेकडील केरळ राज्यातील कोल्लममध्ये कोरोना की जय, कोरोना जिंदाबाद अशा घोषणा दिल्या जात आहेत. कोरोनाला जिंकवण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. आश्चर्यचकित होऊ नका, कारण आम्ही कोरोना विषाणूविषयी नाही. तर कोल्लम महापालिका निवडणुकीत उभे असलेल्या भाजपच्या उमेदवार कोरोना थॉमसबद्दल सांगत आहोत.
केरळमध्ये भाजप उमदेवाराचे नाव आहे 'कोरोना' कोरोना थॉमस या कोल्लम कॉर्पोरेशनमध्ये भाजपच्या उमेदवार आहेत. वडील थॉमस मैथ्यू यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे कोरोना आणि कोरल असे ठेवले होते. इतक्या वर्षात मला कधीच माझ्या नावामुळे अडचण निर्माण झाली नाही. मात्र, कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर लोक माझ्याकडे काहीशा प्रश्नार्थक नजरेने पाहत होते, असे भाजपाच्या उमेदवार कोरोना यांनी सांगितले.
कोरोना थॉमस यांनी ऑक्टोबरमध्ये बाळाला जन्म दिला आहे. त्यांना आणि बाळाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्या काही दिवसांमधून कोरोनामुक्त झाल्या आहेत. कोरोना थॉमस यांचे गेल्या वर्षी जिनू सुरेश यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर त्यांचा राजकारणाशी संबंध आला आहे. जिनू यांचे कुटुंब भाजपासमर्थक आहेत.
केरळात 'कोरोना' नावाचे दुकान -
कोरोना महामारीच्या 7 वर्षांपूर्वीच केरळमधील एका व्यक्तीने आपल्या दुकानाचे नाव कोरोना ठेवले होते. वस्तूमुळे नाही, तर नावामुळे हे दुकान सध्या चर्चेचा विषय बनले आहे. केरळच्या कोट्टायम जॉर्ज नावाच्या व्यक्तीने कोरोना नावाचे दुकान 7 वर्षांपूर्वी सुरू केले. कोरोना एक लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ताज (क्राऊन) होतो. या कोरोना नावाच्या दुकानात किचन, वार्डरोबचे सामान मिळते. कोरोना नावामुळे त्यांचे दुकान प्रसिद्ध झाले असून त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळत असल्याचे जार्ज यांनी सांगितले.