नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकी बरोबरच देशातल्या ११ राज्यांत जवळपास ५४ जागांसाठी पोटनिवडणूक झाल्या होत्या. या निवडणुकांतही भाजपाने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य प्रदेशात भाजपाने मुसंडी मारत सत्ता राखण्यात यश मिळवले आहेत. तर गुजरातमधील ८ ही जागा भाजपाने जिंकल्या.
मध्य प्रदेशात सत्ता राखण्यात यश -
मध्य प्रदेशातील २८ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या पैकी १९ जागांवर भाजपाने विजय नोंदवला आहे. तर काँग्रेसला ९ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंदीयांच्या बंडानंतर काँग्रेसच्या जवळपास २६ आमदारांनी राजिनामा दिला होता. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. कमलनाथ जावून शिवराजसिंह यांची सत्ता आली. त्यामुळे ही पोटनिवडणूक भाजपा आणि काँग्रेससाठी महत्वाची होती. त्यात भाजपाने बाजी मारत सत्ता कायम राखली आहे.
गुजरातमध्ये काँग्रेसला धोबीपछाड -
गुजरातमध्ये ही भाजपाने ८ ही जागा जिंकत काँग्रेसला धोबीपछाड दिली आहे. काँग्रेसच्या ८ आमदारांनी राजिनामा दिल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक झाली होती.
उत्तर प्रदेशमध्येही भाजपाची सरशी -
उत्तर प्रदेश विधानसभेच्या सात जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. यात भाजपाची सरशी झाली आहे. सात पैकी सहा जागांवर भाजपाने बाजी मारली आहे. तर समाजवादी पक्षाच्या पदरात एक जागा पडली आहे. बसपा आणि काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला.