नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने नवी जबाबदारी सोपवली आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये ते महत्त्वाची कामगिरी बजावणार आहेत.
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यासाठीच गुरुवारी झालेल्या बिहार भाजपच्या एका व्हर्चुअल बैठकीलादेखील फडणवीस उपस्थित होते. मात्र, त्यांच्यावर नेमकी कोणती जबाबदारी सोपवण्यात येणार आहे याबाबत भाजपने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांची नेमकी काय भूमिका असणार आहे, याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. मात्र, राज्यातील निवडणुकीच्या तयारीसंदर्भातील सर्व माहिती देवेंद्र फडणवीस यांना देण्यात यावी असा भाजपच्या केंद्रीय नेतृत्तवाकडून आदेश आहे. त्यामुळे यासंबंधी प्रत्येक बैठकीला ते उपस्थित राहतील, अशी माहिती भाजप नेत्याने दिली.
बिहारमधील विधानसभा निवडणुका या येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरला संपणार आहे. देशातील कोरोना परिस्थिती पाहता, निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीसंदर्भात अंतिम निर्णय जाहीर केला नाहीये. आयोगाने यासंदर्भात पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत.