मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून चौदा दिवस उलटले असले तरी राज्यात सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे राज्यात सरकार कोणाचे येणार याविषयी महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता लागली आहे. आज भाजपचे नेते राज्यपालांना भेटणार आहेत.
महाराष्ट्राचा जनादेश महायुतीला असून भाजपचे नेते राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती बुधवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. बुधवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर मुनगंटीवार माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. चांदा ते बांदा आणि मुनगंटीवार ते केसरकर या सगळ्यांनी महायुतीत निवडणूक लढवली आहे. प्रत्येक पाऊल हे महायुतीचे सरकार यावे, यासाठीच पुढे जात आहे. 31 डिसेंबरपूर्वी भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची निवडही होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सत्ता स्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये कोंडी निर्माण झालेली आहे. दोन्ही पक्षांमधली चर्चा बंद आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज सकाळी 11.30 वाजता घेणार आहेत. सत्तास्थापनेसाठी भाजप राज्यपालांकडे गेले, तर त्यामध्ये आम्हाला दुःख नाही. ज्याच्याकडे बहुमत आहे, तो सरकार बनवेल आणि मुख्यमंत्रीपदही त्याच्याकडे राहील, असे बुधवारी संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते.
सत्तास्थापनेसाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नसून आम्हाला जनतेने विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिला आहे, असे बुधवारी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान राज्यातील सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबरच्या रात्री संपणार आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस सत्तास्थापनेसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत.