बिहार : भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अडवाणींना वगळले - bihar
लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्व पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. जाहीर उमेदवारांना पाठिंबा दर्शवण्यापासून ते जनतेचा कौल मिळवण्यापर्यंत सर्व पक्षांमध्ये चुरस लागली आहे. स्टार प्रचारकांच्या बळावर मतदारांचे मत आपल्या पारड्यात पाडण्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी भाजपने बिहारमधील स्टार प्रचारकांची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी यादी जाहीर केली आहे
बिहार : भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अडवाणींना वगळले
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्व पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. जाहीर उमेदवारांना पाठिंबा दर्शवण्यापासून ते जनतेचा कौल मिळवण्यापर्यंत सर्व पक्षांमध्ये चुरस लागली आहे. स्टार प्रचारकांच्या बळावर मतदारांचे मत आपल्या पारड्यात पाडण्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी भाजपने बिहारमधील स्टार प्रचारकांची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी यादी जाहीर केली आहे.
स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आघाडीवर आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा, गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह ४२ नेते स्टार प्रचारक म्हणून पक्षाची धुरा सांभाळणार आहेत. निवडणुकांच्या या रणधुमाळीत सत्ताधारी भाजप सर्वस्व पणाला लावत आहे.
मात्र स्टार प्रचारकांच्या या यादीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवणी, मुरली मनोहर जोशी यांच्या नावांचा समावेश नाही. त्यामुळे विविध चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षाने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी यापूर्वीच जाहीर केली आहे. स्टार प्रचारकांच्या जोरावर प्रत्येक पक्ष आपआपली ताकद आजमावत आहे. मात्र जनता जनार्दन कोणाच्या पाठीशी उभी राहणार हे येणारा काळच सांगेल.