चंदीगड - हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे बडे नेते सभा घेण्यात व्यस्त आहेत. काल (मंगळवारी) मोदींनी राज्यात दोन सभा घेतल्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या ४ सभांचे आयोजन करण्यात आले आहे. फरिदाबाद, बहादुरगड, गुरुग्राम येभे अमित शाह सभा घेणार आहेत.
हरियाणामध्ये भाजपच्या १०० पेक्षा जास्त सभा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील भाजपच्या स्टार प्रचारकांपैकी एक आहेत. मोदींच्याही हरियाणामध्ये चार प्रचारसभा असणार आहेत. यामधील पहिली सभा ही फरिदाबाद जिल्ह्यातील बल्लभगढ येथे १४ ऑक्टोबर रोजी झाली. त्यानंतर काल (१५ ऑक्टोबर) चाखरी दादरी आणि हिसारमध्ये मोदींची सभा झाली.
हेही वाचा- हरियाणा विधानसभा: पाकिस्तानला जाणारं पाणी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आणणार - पंतप्रधान मोदी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील हरियाणामध्ये प्रचारसभा घेत आहेत. ९ ऑक्टोबर रोजी अमित शाह यांनी कैथल, हिसार, भिवानी आणि रोहतक जिल्ह्यांमध्ये सभा घेतली होती.
हरियाणातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी ७० वर्षांपासून पाकिस्तानला जात आहे, मी ते पाणी भारतात अडवेल आणि हरियाणातील शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आणेल. या पाण्यावर भारतातील शेतकऱ्यांचा हक्क आहे, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी हरियाणातील चारखी दादरी येथे प्रचार सभेदरम्यान केले.
हेही वाचा -हरियाणा विधानसभा : राज्यात आज पंतप्रधान मोदींच्या दोन सभांचे आयोजन
मोदींची शेवटची सभा हिसार येथील जाट बहुल भागामध्ये १८ ऑक्टोबरला होणार आहे. भाजपने 'म्हारो सपनो का हरियाणा' म्हणजेच माझ्या स्वप्नातील हरियाणा या नावाने निवडणूक जाहीरनामा घोषित केला आहे. यामध्ये हरियाणा स्टार्टअप मिशन, युवा विकास आणि रोजगार मंत्रालयाची स्थापना, राज्यासाठी एक ऑल इंडिया मेडिकल इस्टिट्यूट(एम्स) आणि २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासने दिले आहे.