नवी दिल्ली -काँग्रेस हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. राजकीय घराणेशाहीवरून भाजपचे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे.
अमित मालवीय यांनी टि्वटरवर 2017 मधील 'इंदू सरकार' चित्रपटातील संवादाचा एक 7 सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये नेहरू-गांधी राजकीय घराणेशाहीवर टीका केली आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजकीय कारकीर्दीतील आणीबाणीचा काळ मांडणारा हा सिनेमा आहे.
प्रियांका गांधी यांची काँग्रेसचे सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर ‘काही लोकांसाठी परिवारच पक्ष आहे. आमच्यासाठी पक्ष हा परिवार आहे,’ अशी टीका मोदींनी केली होती. भाजपाचे अनेक नेते अनेकदा काँग्रेसमध्ये घराणेशाही असून तो केवळ एका कुटुंबाचा पक्ष आहे अशा आशयाची टिका करत असतात.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षात अध्यक्षपदावरून गोंधळाचे वातावरण होते. शनिवारी काँग्रेस कार्यकारिणीची एक बैठक झाली. त्यामध्ये नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत सर्वाधिकार सोनिया गांधींच्याकडे असणार असल्याचे निश्चित आहे.