नवी दिल्ली -संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पॅरिसमध्ये ‘राफेल’च्या केलेल्या पूजनानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी 'अशा ‘तमाशा’ करण्याची गरज नव्हती,' अशी प्रतिक्रिया दिली होती. यामुळे खरगे यांना भाजप आणि पक्षातील संजय निरुपम यांच्याकडूनही टीकेचा सामना करावा लागला. खरगेंच्या वक्तव्यामुळे भाजपने 'क्वात्रोचीला पुजणाऱ्या पक्षाला शस्त्रपूजा करणे नकोसे वाटणारच' असे म्हणत काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.
भाजपने ट्विटद्वारे काँग्रेसचा चांगलाच उपहास केला आहे. 'हवाई दलाच्या आधुनिकीकरणावर काँग्रेसला अडचण आहे. त्यांना भारतीय परंपरांचा त्रास होतो. क्वात्रोचीची पूजा करणाऱ्या पक्षासाठी शस्त्रपूजा करणे ही अडचण वाटणे स्वाभाविकच आहे. आणि खरगेजी, आम्हाला बोफर्स घोटाळ्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद' असे भाजपकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.