नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना आघाडीत अनेक मुद्यांवरून मतभेद समोर येत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकू शकत नाही, असा दावा भाजपचे नते करत आहे. भिन्न विचारसरणीचे पक्ष फक्त सत्तेच्या हव्यासापोटी एकत्र आले आहेत. त्यामुळेच त्यांच्यामध्ये धुसफुस सुरू झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गोपाल कृष्ण अग्रवाल यांच्याशी चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे म्हणजेच एनआयएकडे सोपवला आहे. मात्र, त्यामुळे शरद पवार उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये या मुद्द्यांवरून मतभेद असल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली आहे.
महाराष्ट्रात चालू असलेल्या घडामोडींवर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गोपाल कृष्ण अग्रवाल यांनी ईटीव्ही भारतशी चर्चा केली. महाविकास आघाडी सरकार भिन्न विचारधारा असलेले सरकार आहे. मात्र, सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. याचा भाजपला फायदा होईल का? असा प्रश्न विचारला असता, भाजप लालचीपणाचे राजकारण करत नाही, असे उत्तर त्यांनी दिले.
शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यावर भाजप शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करेल का? असा प्रश्न विचारला असता, ज्या प्रकारे शिवसेनेने युतीतून बाहेर पडत जनभावनेचा आणि मतदारांचा अनादर केला. अशा परिस्थितीत भाजप कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेसोबत हात मिळवणार नाही. महाराष्ट्रातील सरकार अनेक योजना रद्द करत आहे. सत्तेतील पक्षांमध्ये मतभेद सुरू आहेत, हे चांगले लक्षण नसल्याचे अग्रवाल म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारमधील बिघाडीचा भाजप फायदा घेताना दिसत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर भाजप सातत्याने आरोप करत आहे. वीर सावरकरांच्या मुद्द्यांवरूनही भाजपने शिवसेना आणि काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेसकडून सातत्याने सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जात होती. मात्र, त्यामुळे शिवसेनेसमोर हिंदुत्ववादी पक्ष असल्याने अडचण निर्माण झाली होती. आता कोरेगाव भीमा प्रकरामुळे सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.