अहमदाबाद - पाणी समस्या सोडवण्याची मागणी करणाऱ्या एका महिलेला भाजप आमदाराने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची लाजीरवाणी घटना अहमदाबादमधील नरोदा येथील कुबेरनगरमध्ये घडली. आमदार बलराम थवानी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
गुजरातमध्ये हेच का 'अच्छे दिन...' पाणी मागणाऱ्या महिलेला भाजप आमदाराने लाथाबुक्क्यांनी तुडवले..! - अहमदाबाद
भाजप आमदाराने महिलेला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नीतू तेजवानी असे पीडित महिलेचे नाव आहे. परिसरात पाणीटंचाई असल्याने पाणी समस्या सोडवण्याची मागणी करण्यासाठी नीतू या काही दिवसांपूर्वी थवानींच्या कुबेरनगरमधील कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पाणी न मिळाल्यास कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आमदाराचा भाऊ किशोर थवानी यांनी काहीही न ऐकता वाद घातला. तसेच काही लोकांना धक्काबुक्कीही केली असल्याचा आरोप नितू यांनी केला आहे.
अद्यापही पाण्याची समस्या सुटली नसल्याने नितू रविवारी पुन्हा त्यांच्या कार्यालयात गेल्या. त्यावेळी आमदारांनी काहीही ऐकले नाही. त्यांना मारायला सुरुवात केली. एवढेच नाहीतर काहीजण त्यांना मारण्यासाठी काठ्या घेऊन आले होते. तसेच नितू यांचे पती राजेश यांनाही त्यांनी धक्काबुक्की केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. यामध्ये नारंगी रंगाचा कुर्ता घातलेले बलराम महिलेला लाथा मारत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या बाजूला सफेद कुर्त्यात असलेली व्यक्ती त्या महिलेच्या कानशिलात लगावताना दिसत आहे.
ही अत्यंत लाजीरवाणी घटना आहे. लोकप्रतिनीधींनी जनतेसोबत चांगल्यारितीने वागायला पाहिजे. मात्र, लोकसप्रतिनीधी असे वागत असले तर आम्ही या घटनेचा निषेध करतो, असे भाजप प्रवक्ते भरत पंडे म्हणाले. तसेच प्रदेशाध्यक्ष जितूभाई वाघानी यांनी आमदार थवानी यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. तसेच माफी मागण्यास सांगितले असल्याचे पंडे म्हणाले.