भोपाळ :मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी त्यांनी स्वतःच ट्विट करत याबाबत माहिती दिली.
गेल्या तीन दिवसांपासून आपल्याला ताप जाणवत होता. त्यामुळे कोरोना चाचणी केली असता, आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही उमा भारतींनी ट्विटरद्वारे केले आहे.
शारीरिक अंतर पाळण्याचे आणि कोरोनासंबंधी इतर नियमांचे पालन करुनही आपण कोरोना पॉझिटिव्ह आलो आहोत. चार दिवसांनी आपण पुन्हा कोरोना चाचणी करणार असून, त्या चाचणीचा जो अहवाल येईल त्यानुसार पुढील नियोजन करणार असल्याचेही भारतींनी सांगितले.
यापूर्वी राजस्थान भाजपचे अध्यक्ष सतीश पूनिया यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तसेच, २ सप्टेंबरला राजस्थान विधानसभेचे उप विरोधीपक्षनेते राजेंद्र राठोड यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
हेही वाचा :वाजपेयी-बादल यांच्या संकल्पनेतील हे 'एनडीए' नाही; हरसिमरत कौर यांचे मत