चंदीगड -हरियाणामधील भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांनी एका सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्या अधिकाऱ्याला चपलेने मारताना दिसून येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ हरियाणाच्या हिसार जिल्ह्यामधील बालसमंद गावातील आहे. हे गाव म्हणजे हिसार मार्केट कमीटीचे पर्चेस पॉईंट आहे. याठिकाणी पर्चेसिंगचे काम सुरू असतानाच सोनाली फोगाट तिथे पोहोचल्या, आणि या अधिकाऱ्यासोबत त्यांचा वाद झाला.
यानंतर त्यांनी त्या अधिकाऱ्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. "तुमच्यासारख्या लोकांना जेवढे थप्पड मारू तेवढे कमी आहेत, तुम्हाला जगण्याचा काहीही अधिकार नाही" असेही त्या या अधिकाऱ्याला म्हणताना दिसून येत आहेत. तसेच या व्हिडिओमध्ये हा अधिकारी चक्क रडतानाही दिसून येत आहे.