कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये आगामी २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रसिद्ध राजनीतीज्ञ प्रशांत किशोर यांची मदत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. त्यावर भाजप नेते मुकुल रॉय यांनी वादग्रस्त विधान केले आहे. प्रशांत किशोर आता ममतांना कोणती साडी नेसावी, हे सांगणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.
मुकुल रॉय यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. बंगालमध्ये ममतांची जादू ओसरली आसून त्यासाठीच त्यांनी प्रशांत किशोर यांना पाचारण केले आहे. ममतांनी साडी कशी नेसावी, वेणी कशी घालावी आणि हात कसा हालवावा, हे आता प्रशांत किशोर ठरवतील, असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी प्रशांत किशोर हे भाजपचा सहयोगी असलेल्या जदयूचेही उपाध्यक्ष आहेत, त्याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न केला असता रॉय यांनी प्रशांत किशोर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले प्रशांत किशोर याआधी अखिलेश यादवांनाही भेटले आहेत. त्यांनी अखिलेश यांना उत्तर प्रेदेशातून संपवून टाकले आहेच. आता ते ममतांनाही बंगालमधून संपवण्याची तयारी करत आहेत.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. ममतांनी भाजपच्या केंद्रातील सरकारलाही थेट आव्हान केले आहे. येत्या १५ जूनला होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीवरही त्यांनी बहिष्कार घातला आहे. शिवाय आयुष्यमान भारत योजना बंगालमध्ये लागू करण्यासाठी त्यांनी विरोध केला होता. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेच्या निधीसाठी केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांची यादी पाठवण्यास त्यांनी नकार दिला आहे.