नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत पहिल्यांदाच खासदार झालेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आल्या आहेत. त्यांनी दिग्गज काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना पराभवाचा धक्का दिला होता. 'सोहोर येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी चक्क 'मी खासदार झालेय ते गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी नाही,' असे वक्तव्य केले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच, ठाकूर यांना अशी बेताल वक्तव्ये न करण्याविषयी इशारा देण्यात आला आहे. ठाकूर आणि नड्डा यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद न साधणेच पसंत केले. मात्र, प्रज्ञा यांना 'पक्षाला अडचणीत आणणारी बेताल वक्तव्ये करू नका,' असा इशारा मिळाल्याचे सूत्रांकडून समजते.
'आम्ही तुमची गटारे स्वच्छ करण्यासाठी निवडून आलेलो नाही. तुमची शौचालय साफ करण्यासाठी खासदार झालेलो नाही. हे समजून घ्या. ज्या कामासाठी आम्ही निवडून आलो आहोत ते आम्ही प्रामाणिकपणे करू. मी हे आधीही सांगितले आहे आणि आता पुन्हा सांगत आहे,' असे प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भोपाळमध्ये काही भाजपा समर्थकांशी संवाद साधताना म्हटले होते. एका भाजप कार्यकर्त्याने आपल्या परिसरात स्वच्छता नसल्याची तक्रार केल्यानंतर प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हे वक्तव्य केले होते.हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे हे वक्तव्य नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाची खिल्ली उडवणारे असल्याचे म्हटले होते. काही मोदी आणि भाजप समर्थकांनी साध्वी प्रज्ञा यांना 'तुम्हाला स्वच्छता करायची नाही तर करु नका पण असे शब्द वापरुन विरोधकांना मोदी सरकारवर टीकेची संधी देऊ नका,' असे म्हटले आहे. तुम्ही आम्हाला मूर्ख बनवण्यासाठी खासदार झाला आहात का? असाही प्रश्न काही नेटकऱ्यांनी विचारला आहे. मोदींनी 'स्वच्छ भारत' कार्यक्रमाला आपल्या सरकारच्या अजेंड्याचा प्रमुख बिंदू बनवले होते. त्यामुळे प्रज्ञा यांची ही टिप्पणी भाजपला शरमिंदा करणारी होती. त्यांच्या वक्तव्यांमुळे भाजपसमोर अडचणी निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रज्ञा ठाकूर यांनी महात्मा गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे याला 'देशभक्त' म्हटले होते. या वक्तव्यावर जोरदार टीका झाल्यानंतर त्यांना माफी मागावी लागली होती. याशिवाय, नरेंद्र मोदींनाही 'ठाकूर यांनी माफी मागितली असली तरी आपण त्यांना कधीही माफ करू शकणार नाही,' असे म्हणावे लागले होते. ठाकूर यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. मध्य प्रदेशातील खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या २००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असून सध्या जामीनावर आहेत.