नवी दिल्ली - बिहारमधील विधानसभा निवडणुका येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारची आगामी विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी, संयुक्त जनता दल (जदयू) व लोक जनशक्ती पार्टी एकत्र लढवणार असल्याची घोषणा आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी केली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे.
जे.पी नड्डा यांनी आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश कार्य समितीची व्हर्च्युअल बैठक घेतली. यावेळी त्यांना बिहार निवडणुकीमध्ये एनडीएचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. जेव्हा- जेव्हा भाजप, जदयू आणि जनशक्ती पक्ष एकत्र येतात. तेव्हा एनडीएचाच विजय होतो, असे ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपकडून कोरोना काळात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा उल्लेख केला. मोदींचा संदेश घरा-घरात पोहचवण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. आपल्या सर्वांना एकत्र कार्य करायचे आहे आणि मोदींच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहचवायच्या आहेत, असे नड्डा म्हणाले. तसेच त्यांनी विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. विरोध पक्षांकडे विचार, संकल्प, दृष्टी यापैकी काहीच नाही. त्यांची शक्ती संपली आहे, असेही ते म्हणाले.