नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी आणि पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्यादरम्यानचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी स्वामी यांनी केलेल्या एका ट्विटनंतर ही बाब स्पष्ट झाली.
"भाजप आयटी सेलचे काही सदस्य माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यासाठी फेक ट्विटर हँडल्सची मदत घेत आहेत. ज्याप्रमाणे आयटी सेल करत असलेल्या कामासाठी पक्षाला जबाबदार धरता येत नाही, त्याचप्रमाणे जर माझ्या समर्थकांनी अशाच प्रकारचे वैयक्तिक हल्ले सुरू केले, तर त्याला मी जबाबदार असणार नाही." अशा आशयाचे ट्विट स्वामी यांनी केले होते.
यानंतर एका समर्थकाने स्वामींना या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला. त्यावर प्रत्युत्तर देताना स्वामी म्हणाले, की "मी या सर्वाकडे दुर्लक्ष करत आहे, मात्र पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी. मालवीय नावाचे एक पात्र सगळीकडे मलीनता पसरवत आहे. आमचा पक्ष 'मर्यादा पुरुषोत्तम'चे समर्थन करणारा आहे, ना की रावण किंवा दुःशासनचे."
स्वामी आणि मालवीय यांच्यामध्ये नेमका कशामुळे वाद झाला आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाही मिळाली. तसेच, यासंदर्भात मालवीय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते फोन उचलत नसल्याचे समजले आहे.
हेही वाचा :लडाख सीमारेषेवर भारत-चीन दरम्यान गोळीबार; करारानंतर पहिल्यांदाच शस्त्रसंधीचे उल्लंघन