नवी दिल्ली - सध्या देशात गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सत्तेत असलेला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष. भाजप आज 40 स्थापना दिवस साजरा करत आहे. भाजपचे नेते , देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांना कोरोनाविरोधातील लढाईत गरजुची मदत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. तर गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी पक्ष स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
भाजपचा 40 स्थापना दिवस अशा वेळी आला आहे. जेव्हा देश कोरोनाविरोधात लढत आहे. मी कार्यकर्त्यांना आग्रह करतो की त्यांनी जगत प्रकाश नड्डा यांच्या सुचनांचे पालन करवे. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून गरजू लोकांना मदत करावी आणि एकत्र येत भारताला कोरोनापासून मुक्त करावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
स्थापना दिनाच्या सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने ज्यांनी आपल्या रक्ताने आणि कष्टाने पक्षाला उभे केले, त्या सर्वांना मी आदरांजली वाहतो. त्यांच्यामुळेच आज भाजपाला कोट्यवधी भारतीयांची सेवा करण्याची संधी मिळाली. जेव्हाही भाजपाला देशाची सेवा करण्याीच संधी मिळाली आहे. तेव्हा पक्षाने सुशासन आणि गरिबांच्या सबलीकरणावर भर दिला. पक्षाच्या तत्त्वांनुसार आपल्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सामाजिक सेवेचे नवे उदाहरण उभे केले, असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० मध्ये झालेली असली, तरी या पक्षाच्या राजकीय प्रवासाचं उगमस्थान १९५१ मध्ये आहे. २१ ऑक्टोबर १९५१ मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली होती. हा पक्ष पुढे १९७७ मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षात विलीन झाला. पण जनता प्रयोग फसला आणि जनसंघातील मंडळींनी भारतीय जनता पक्ष स्थापन केला. जनसंघाचा पहिला टप्पा १९५१ ते १९७७ असा आहे. तर दुसरा टप्पा १९८०पासून आजपर्यंतचा आहे.