नवी दिल्ली - राजस्थानातील वाढत्या गुन्हेगारीवरून भाजपाने काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. 'राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असून भाजपशासित राज्यात 'राजकीय पर्यटन' करण्याऐवजी राहुल गांधींनी कायदा सुव्यवस्थेवर लक्ष द्यावे, असा निशाणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी साधला आहे.
राजस्थानातील करौली जिल्ह्यात एका पुजाऱ्याच्या हत्येने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बुधवारी जिल्ह्यातील सपोटरा तहसीलमधील एका गावात मंदिरातील पुजाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. गुरुवारी गंभीर जखमी झालेल्या पुजाऱ्याचा जयपूरमधील सवाई माधोसिंह रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर राज्यात या विषयावरुन राजकारण पेटले आहे. भाजपसह विरोधकांनी गेहलोत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
'भाजपशासित राज्यात राजकीय पर्यटनाला जाण्यापेक्षा राहुल गांधी यांनी राजस्थानातील महिलांवरील गुन्ह्यांवर लक्ष द्यावे आणि सरकारच्या अपयशाबद्दल जनतेची माफी मागावी', असे जावडेकर म्हणाले आहेत. राजस्थानातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे ते म्हणाले.