नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने राज्यसभेत रिक्त होणाऱ्या जागांसाठी उत्तप्रदेशातून आठ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तसेच एक उमेदवार उत्तराखंड राज्यातून मैदानात आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 10 जगांसाठी निवडणूक जाहीर केली होती. तसेच उत्तराखंडमधील एक जागा येणाऱ्या 25 नोव्हेंबरपर्यंत रिक्त होणार आहे. 9 नोव्हेंबरला या सर्व जागांसाठी निवडणुका पार पडतील.
भाजपाचे उत्तर प्रदेशात 304 आमदार आहेत. तसेच योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात तगडं सरकार आहे. याचा फायदा राज्यसभेवरील जागा निवडून देण्यात होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. राज्यातील तीन चौथाई बहुमताच्या जोरावर आठ खासदार निवडून येण्याची शक्यता बळावली आहे.
याचप्रमाणे भाजपाचे उत्तराखंडमधील उमेदवार नरेश भन्सल यांचीही बिनविरोध निवड होण्याची शक्यता जास्त आहे. या नव्या राज्यसभा सदस्यांसह भाजपाचे राज्यसभेतील खासदारांचे संख्याबळ 90 होईल. राज्यसभेत एकूण 245 जागा असतात.
उत्तरप्रदेशमधील एकूण 10 रिक्त जागांपैकी 3 भाजपा, 4 समाजवादी पार्टी, 2 बहुजन समाज पार्टी आणि एक काँग्रेसची जागा आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी, पक्षाचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह आणि नीरज शेखर यांचा समावेश आहे. तिघेही राज्यसभेचे विद्यमान खासदार आहेत.