नवी दिल्ली -कर्नाटकात चालू असलेल्या परिस्थितीवर बोलताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आझाद म्हणाले, भाजप पक्ष आणि त्यापक्षाचे नेते क्वचितच संविधानाची काळजी करताना दिसून येतात.
'भाजप नेते क्वचितच संविधानाची काळजी करतात' - आमदार
भाजपला सत्तेत आल्यापासूनच सेक्युलॅरिझम, लोकशाही आणि विरोधकांना संपवायचे आहे. भारतात फक्त एकच पक्ष असला पाहिजे, हेच त्यांचे उद्दिष्ट आहे, अशी टीका गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.
गुलाम नबी आझाद कर्नाटकच्या परिस्थितीवर म्हणाले, भाजपला सत्तेत आल्यापासून सेक्युलॅरिझम, लोकशाही आणि विरोधकांना संपवायचे आहे, असे दिसून येत आहे. भारतात फक्त एकच पक्ष असला पाहिजे, हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. हे लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात आहे. केंद्र सरकारच्या आणि राज भवनाच्या सहकार्याने भाजप नेत्यांनी काँग्रेस आमदारांना आणि मंत्र्यांना विशेष विमानाद्वारे मुंबईला पोहचवले. महाराष्ट्र सरकारने आमदारांना सुरक्षा पुरवली. भाजप नेत्यांशिवाय दुसऱ्या कोणालाही काँग्रेस आमदार आणि मंत्र्यांना भेटू दिले जात नाही.
काँग्रेसने कर्नाटक आणि गोव्यात सुरू असलेल्या परिस्थितीचा निषेध करताना संसदेच्या दोन्ही सभागृहाचा त्याग केला होता. काँग्रेसकडून संसदेबाहेर लोकशाही बचावाच्या नावाने आंदोलनही करण्यात आले होते.