राष्ट्र निर्मितीसाठी सार्वजनिक धोरणे राबवण्याचे आणि प्रशासन चालवण्याचे त्यांचे कसब आणि मर्मदृष्टी. ज्यामुळे अनेकांनी त्यांना आधुनिक भारतातील चाणक्य ही उपाधी दिली, असे देशाचे महान विद्वान दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची २८ जून रोजी जन्मशताब्दी आहे. अल्पमताचे सरकार असताना ५ वर्षे पूर्ण कार्यकाळ यशस्वीरीत्या सरकार चालवण्याच्या त्यांच्या राजकीय कौशल्यामुळे लोकांनी त्यांना आधुनिक चाणक्याची उपाधी दिली, अशा समाज सुधारक, शिक्षणतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञ आणि विद्वान अभ्यासपूर्ण अष्टपैलू व्यक्तीमत्वाला सर्वप्रथम मी आदरांजली वाहतो.
डॉ. मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री असताना पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले हे त्यांचे सर्वात मोठे योगदान आहेच. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला परवाना प्रक्रियेच्या जटील कार्यपद्धतीच्या तावडीतून बाहेर काढून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांच्या स्पर्धेत उतरवले, त्यांचे हे महत्त्वपूर्ण कार्य जनतेच्या मनात खोलवर रुजले आहेच. याची पुनरावृत्ती मी करणार नाही. मी फक्त एवढेच सांगेल की, गेली पाच दशके ‘हिंदु ग्रोथ रेट’च्या जोखडात अडकून पडलेल्या भारत देशाला प्रथमच त्यांनी बाहेर काढले. त्यांनी जागतिकीकरण करत असताना कमी विकास दर असलेल्या दुर्बल अर्थव्यवस्थेला ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ रुपाने भारताला एका नव्या उंचीवर नेवून ठेवले.
मी जून १९९४ ते ऑक्टोबर १९९७ पर्यंत केंद्रीय गृहसचिव म्हणून काम केले. पंतप्रधानांचे गृहसचिव हे पद सरकारमधील सर्वात संवेदनशील पदांपैकी एक पद असते. सामान्यत: हे पद पंतप्रधानांसोबत यापूर्वी काम केलेल्या किंवा त्यांच्या राज्यातील केडरच्या आयएएस अधिकाऱ्याला दिले जाते. त्याचबरोबर त्या संबंधित अधिकाऱ्यावर पंतप्रधानांचा पूर्णपणे विश्वास असायला लागतो, अशाच व्यक्तीला गृहसचिव पदावर नियुक्त केले जाते. परंतु माझ्या बाबतीत थोडंस वेगळं घडलं, मी महाराष्ट्र केडरचा होतो. तसेच मी १९८२ ते ८६ दरम्यान जॉइन्ट सेक्रेटरी पदावर काम केले होते, पण हा कार्यकाळ वगळता मला भारत सरकारसाठी काम करण्याचा फारसा अनुभव नव्हता. १९९३-९४ मध्ये माझ्या नोकरीची दुसरी कारकीर्द सुरु झाली. जेव्हा मी पहिल्यांदा पंतप्रधान नरसिंह राव यांना भेटलो, तेव्हा त्यांनी मला काही महिन्यांकरिता मला शहर विकास व गृहनिर्माण मंत्रालयाचे सचिव म्हणून नियुक्त केले. त्यानंतर मला गृहसचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते. कारण तत्कालीन गृहमंत्री शंकरराव बी. चव्हाण यांनी मी एक सक्षम व प्रामाणिक अधिकारी असल्याचा उल्लेख पंतप्रधानांकडे केला होता. शंकरराव चव्हाण हे मुळचे महाराष्ट्राचे होते आणि त्यांचा माझ्यावर विश्वासही होता. मी याठिकाणी एवढा लांबलचक उल्लेख यासाठी केला की, पी. व्ही. नरसिंह राव यांनी माझी नियुक्ती वशिलेबाजीवर नव्हे तर शुद्ध गुणवत्तेच्या आधारावर केली होती. कारण त्यांनी गुणवत्तेच्या आधारावरच विरोधी पक्षनेते सुब्रमण्यम स्वामी यांना कॅबिनेट मंत्रिमंडळातील महत्त्वाचे पद दिले होते. त्याचबरोबर दुसरे विरोधी पक्षनेते आणि प्रभावशाली सभापती अटलबिहारी वाजपेयी यांना संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांची भारताचे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली होती.
मला राव यांच्यात एक महत्त्वपूर्ण गुण दिसला. तो म्हणजे ते खूप शांत आणि संयमी होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या राजकीय विरोधकांनी (बहुतेक त्यांच्याच काँग्रेस पक्षातील नेत्यांनी) त्यांच्यासमोर अनेक प्रकारची संकटे निर्माण केली, पण ते कधीच डगमगले नाहीत. त्यांना बाबरी मस्जिदच्या पाडावा सारख्या प्रशासकीय आणि राजकीय समस्यांचा सामना करावा लागला. त्यांनी अशा ज्वलंत प्रकरणाची संयमी हाताळणी केली. या काळात त्यांच्यावर बरेच आरोप – प्रत्यारोप झाले. पण बाबरी मशीद प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करणाऱ्या ‘द लिब्राहन कमिटी’ने असे म्हटले की, पंतप्रधानांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांच्यावर दोषारोप ठेवता येणार नाही.
त्यांचे राज्य कारभाराचे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये म्हणजे, त्यांची भारतीय राज्यघटनेवर असलेली त्यांची संपूर्ण निष्ठा. ज्या-ज्या वेळी त्यांच्याकडे कोणताही नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी येत असायचा, तेव्हा ते पहिला प्रश्न विचारायचे की “हा प्रस्ताव किंवा धोरण हे संविधानिक आहे का?” तसेच त्यांच्या कार्यकाळात त्यांनी घटनेच्या विरोधात असलेल्या कोणत्याही प्रस्तावाचा कधीही स्वीकार केला नाही.
ते भारताचे पहिले नेते होते, ज्यांनी ‘लुक ईस्ट पॉलिसी’ची पायाभरणी केले. त्यापूर्वी आपल्या देशाचे लक्ष केवळ पाश्चिमात्य देशांकडे किंवा आखाती राष्ट्रांकडे असायचे. जर भारताला आशिया खंडातील स्थान भक्कम करायचे असेल तर, आपल्याला बांगलादेश, म्यानमार, थायलंड आणि अन्य आसियान देशांशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करावे लागतील, हा विचार सर्वप्रथम त्यांनीच केला. त्याचबरोबर त्यांनी इस्रायल देशाशी मजबूत संबंध निर्माण केले आणि १९९२ मध्ये त्यांना नवी दिल्लीत दूतावास उभारण्याची परवानगीही दिली. त्यांनीच इराणशी मजबूत आणि घट्ट नाते निर्माण केले. तसेच नरसिम्हा राव यांनीच देशाला आण्विक चाचण्या आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाला मोठ्या यशाच्या दिशेने पुढे जाण्यास चालना दिली. १९९६ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काही दिवस अगोदर मे महिन्यात त्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांना ‘अणु फ्यूजन’ बॉम्बचे परिक्षण घेण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले होते. पण निवडणुकांचे निकाल काँग्रेसच्या विरोधात गेले. परिणामी शेवटी अण्वस्त्रांची चाचणी वाजपेयी सरकारने १९९८ मध्ये केली.