मुंबई -केरळ राज्यातील सिपीएम पक्षाचे प्रमुख बलाकृष्णन कोडीएरी यांचा मुलगा बिनोय कोडीएरी याच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या ओशिवरा पोलिसांनी एका 33 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करण्याचा गुन्हा दाखल आहे. पुढील तापसाकरता ओशिवरा पोलिसांना बिनोय कोडीएरी हा डीएनए टेस्ट साठी रक्ताचे नमुने देण्यास टाळाटाळ करत असताना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने बिनोय यास जेजे रुग्णालयात रक्ताचे नमुने देण्याचे आदेश दिले होते.याला अनुसरून मंगळवारी जेजे रुग्णालयात बिनोय कोडीएरी हा रक्ताचे नमुने देण्यास हजर होता.
एका पीडित महिलेने बलात्काराचा गुन्हा नोंदवीत आपल्याला बिनोयकडून मुलगा झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणी दिंडोशी न्यायालयात बिनोय कोडीएरी याच्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यात बिनोय कोडीएरी यास दिंडोशी न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. बिनोय कोडीएरी यास आठवड्यातील प्रत्येक सोमवारी ओशिवरा पोलीस ठाण्यात महिनाभर हजेरी द्यावी लागणार असून पोलिसांना तापासत सहकार्य करावे लागणार आहे. मात्र, या अटी असतानाही बिनोय आजारपणाचे कारण देत रक्ताचे नमुने देण्यास टाळाटाळ करत होता.