नवी दिल्ली - बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन तर्फे दरवर्शी शाश्वत विकासासाठी विशेष कामगिरी करणाऱ्या एका जागतिक नेत्याला 'ग्लोबल गोलकीपर' पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. 'स्वच्छ भारत अभियाना'च्या माध्यमातून स्वच्छतेच्या क्षेत्रात केलेल्या कामाचे नेतृत्व केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
२१ ते २७ सप्टेंबर पर्यंत मोदी अमेरिका दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात कोणकोणते कार्यक्रम ते घेणार आहेत याची माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली.
२२ सप्टेंबर रोजी मोदी हे अमेरिकेतील भारतीयांना संबोधतील. यावेळी त्यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, कोरियाचे राष्ट्राध्यक्ष; सिंगापूर, न्यूझीलंड, बांग्लादेश आणि जमैका या देशांचे पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस देखील उपस्थित असणार आहेत.या कार्यक्रमावेळी तीन उपक्रमांच्या घोषणा होणार आहेत. यामधील एक म्हणजे, 'गांधी सोलार पार्क'. महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून, संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्कमधील मुख्यालयाच्या छतावर सोलार पॅनल बसवण्यात येणार आहेत. अक्षय उर्जेच्या प्रसारासाठी आणि सौर ऊर्जेच्या वापराबाबतची आपली वचनबद्धता दर्शवण्यासाठी, या उपक्रमाला भारताडून एक दशलक्ष डॉलर्सचे अनुदान देण्यात येणार आहे.
२७ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करतील. २०१४ नंतर पहिल्यांदाच पंतप्रधान अशा सभेमध्ये भाषण करणार आहेत.या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी हे डोनाल्ड ट्रम्प आणि इतर काही देशांच्या नेत्यांसह साधारणपणे २० द्विपक्षीय चर्चा करतील अशी शक्यता आहे. असेही विजय गोखले यांनी सांगितले.