पाटणा - बिहार निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठपल्या आहेत. या निवडणुकांना उभे असलेल्या उमेदवारांपैकी, राष्ट्रीय जनता दलाकडे (राजद) सर्वाधिक गुन्हेगार उमेदवार असल्याची माहिती समोर आली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने २०१५च्या विधानसभा निवडणुकांवेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी जाहीर केली आहे.
यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार, राजदच्या ४१ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तसेच या आकडेवारी काँग्रेस दुसऱ्या स्थानी असून, पक्षाच्या ४० टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तिसऱ्या क्रमांकावर जनता दल युनायटेड (जदयू) असून, भारतीय जनता पार्टी चौथ्या स्थानी आहे. या दोन्ही पक्षांमधील अनुक्रमे ३७ आणि ३५ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.
यावेळी उमेदवारी मिळालेल्या एकूण उमेदवारांपैकी ११ आमदारांवर हत्येचा गुन्हा दाखल आहे. तसेच, ३० आमदारांवर हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. पाच आमदारांवर महिला अत्याचारांसंबंधी गुन्हे दाखल आहेत, तर एका आमदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
एकूण २४० आमदारांपैकी ६७ लखपती आहेत. जदयूच्या आमदार खगारिया पूनम देवी या सर्वात श्रीमंत उमेदवार असून, त्यांच्याकडे ४१ कोटींची संपत्ती आहे. तर, काँग्रेसचे आमदार अजित शर्मा यांच्याकडे ४० कोटींची संपत्ती आहे, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे. यासोबतच, एकूण आमदारांपैकी १३४ आमदारांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे, तर नऊ आमदार हे केवळ साक्षर आहेत अशी माहितीही या अहवालात समोर आली आहे.
हेही वाचा :उत्तर प्रदेशात वीज कोसळून १३ ठार!