पटना - देशहितासाठी तरी तुम्ही भाजपशी असलेले संबंध तोडावेत, असे आवाहन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना केले आहे. बिहारच्या किशनगंजमध्ये, नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची (एनपीआर) विरोधात आयोजित केलेल्या एका मोर्चामध्ये ते बोलत होते.
भाजपशी संबंध तोडा; ओवैसींचे नितीश कुमारांना आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे साधे-सरळ राजकारणी नाहीत. त्यामुळे नितीश कुमार यांनी अशा लोकांची साथ सोडायला हवी. नितीश कुमार यांना मी आवाहन करतो, की त्यांनी भाजपची साथ सोडावी. त्यांनी तसे केल्यास आम्ही सर्व तुम्हाला साथ देऊ. तुम्ही बिहारमध्ये आपले नाव कमावले आहे. त्यामुळे देशहितासाठी तरी भाजपची साथ सोडा, असे ओवैसी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, की धर्माच्या नावावर देशाचे विभाजन होत असलेले तुम्ही कसे पाहू शकता? हे सर्व पाहून त्याकडे तुम्ही कशी काय डोळेझाक करू शकता? मला माहिती आहे, की तुम्हाला भाजप एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदे देणार आहे. मात्र, तेवढ्यासाठी तुम्ही राज्यघटनेशी तडजोड करू नका. मी तुम्हाला विनंती करतो, की तुम्ही एनपीआरच्या विरोधासाठी पुढे या आणि बिहारमध्ये एनपीआर लागू होणार नाही, असा ठराव संमत करा.
याआधी ओवैसींनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना कॅब आणि एनआरसीबाबत केंद्रसरकारला दिलेल्या पाठिंब्याबाबत पुनर्विचार करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर रेड्डींनी राज्यात एनआरसी लागू करणार नसल्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता नितीश कुमार काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : 'नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारे लोक दलित-विरोधी'