पाटणा - बिहार राज्यामध्ये वैद्यकीय निष्काळजीपणा आणि अनास्थेचे एक मन हेलावून टाकणारे प्रकरण समोर आले आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीणामुळे एका नवजात अर्भकाचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला हृदयासंबंधी विकार असल्याने तत्काळ उपचारांची गरज होती. मात्र, त्याला उपचार मिळाले नाहीत. त्याऐवजी नवजात बालकाला ऑक्सिजन सिलेंडरची नळी लावून बाळाला ट्रे मध्ये घेवून फिरण्याची वेळ आई वडिलांवर आली. मुलाचे पिता खांद्यावर ऑक्सिजनचे सिलेंडर घेवून आणि आई ट्रेमध्ये बाळाला ठेवून उपचारासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात फिरत होते. मात्र, वेळीच उपचार न मिळाल्याने अर्भक दगावले.
सुमन कुमार नामक व्यक्ती त्याची पत्नी आणि नवजात अर्भकाचा फोटा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत सुमन कुमारने खांद्यावर ऑक्सिजन सिलेंडर घेतले असून त्याची पत्नी नवजात बालकाला ट्रेमध्ये घेवून रुग्णालयात फिरत असल्याचे दिसत आहे. बक्सार जिल्ह्यातील सदर जिल्हा रुग्णालयातील ही घटना आहे.
ही घटना 23 जुलैला घडली. विशेष म्हणजे बक्सार जिल्हा राज्याचे आरोेग्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांचा मतदारसंघ आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे. तर मृत अर्भकाचे पिता सुमन कुमार यांनी रुग्णालय प्रशासनावर उपचार न केल्याचा आरोप केला आहे.
सुमन कुमारने सांगितले की, ‘मी पत्नीला घेवून सदर रुग्णालयात प्रसूतीसाठी गेेले होतो. मात्र, रुग्णालयाने प्रसूती करण्यास नकार दिला. त्यांनी आम्हाल खासगी रुग्णालयात जाण्यास सांगितले. खासगी रुग्णालयात प्रसूती झाली. मात्र, बाळाला हृदयासंबंधी विकार होता. रुग्णालयाने उपचार करण्याऐवजी आम्हाला पुन्हा 18 किमी लांब असलेल्या सरकारी रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यांनी आम्हाला एक ऑक्सिजन सिलेंडर आणि ट्रे दिला. ऑक्सिजन सुरू असताना बाळाला घेवून आम्ही पुन्हा सरकारी रुग्णालयात आलो’.
‘या काळात आम्हाला कोणीही मदत केली नाही. रुग्णालयातही कोणी मदतीला आले नाही. रुग्णालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यात वेळ गेल्याने बाळाची प्रकृती आणखी खालावली. त्यातच बाळ दगावले. जर वेळेवर उपचार मिळाले असते तर बाळ वाचले असते’, असे सुमन कुमार म्हणाले. या प्रकऱणी जिल्हा रुग्णालयाने चौकशी सुरु केली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.