नवी दिल्ली - महापुरामुळे बिहारमधील परिस्थिती बिकट झाली आहे. आतापर्यंत महापुराचा तब्बल 39 लाख लोकांना फटका बसला आहे. नेपाळमधील धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे बिहारमध्ये पूरस्थितीत अधिक वाढ झाली असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
मधुबनी आणि सिवान जिल्ह्यातील 71 पंचायतींना आतापर्यंत पुराचा फटका बसला नव्हता. मात्र, गुरुवारी तेथीलही जनजीवन अस्ताव्यस्त झाले. बाधित जिल्ह्यांची संख्या 14 वर पोहोचली आहे. जवळपास 8 हजार लोकांची सुटका केली आहे, ज्यात मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांचा समावेश आहे.