पटना -बिहारमध्ये मागील काही दिवसांपासून पुराने थैमान घातले आहे. मागील 24 तासांत झालेल्या जोरदार पावसाचा फटका बिहारच्या 16 जिल्ह्यांना बसला आहे. या आपत्तीत आत्तापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 63 लाख नागरिक प्रभावित झाले आहेत. मंगळवारी आणखी सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती निवारण विभागाने दिली.
बिहार: पुरामुळे बळींचा आकडा 19 वर; 63 लाखांपेक्षा जास्त नागरिक प्रभावित नेपाळमधील डोंगरभागातून मैदानी प्रदेशात वाहणाऱ्या नद्यांना पूर आल्याने बिहारमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील 24 तासांत सात लाख आणखी नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. सहरसा आणि मेधापूर जिल्ह्याचा बराच भाग पाण्याखाली गेला आहे. 6 मृत्यूंपैकी 4 मुज्जफरपूर आणि दोन सिवान जिल्ह्यात झाले. सर्वात जास्त जीवितहानी दरभंगा जिल्ह्यात झाली असून सात जणांचा मृत्यू झाला आहे.
पूर प्रभावित जिल्हे
सितामढी, शिओहर, सुपौल, किशनगंज, दरभंगा, मुज्जफरापूर, गोपालगंज, वेस्ट चंपारण, ईस्ट चंपारण, खगरिया, सरन, समस्तीपूर, सिवान, मधुबनी, मेधापूर आणि सहरसा जिल्ह्यांना पुराचा सर्वात जास्त फटका बसला आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारण विभाग आणि राज्याची 20 पथके पुरगस्त नागरिकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आली आहेत. आत्तापर्यंत 4 लाख 40 हजार नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. सुमारे दहा लाख नागरिकांना कम्युनिटी किचनद्वारे अन्न पुरविण्यात येत आहे. सुमारे 18 हजार नागरिक 17 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत.
बिहारमधील पुराने मागील 16 वर्षातील विक्रम मोडीत काढला आहे. ईस्ट चंपारन जिल्ह्यात नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. ईस्ट चंपारन जिल्ह्यात नदीवरील धरण फुटल्याने पुराचे पाणी केसरीया जिल्ह्यात आले आहे. राज्य मार्ग 74 मागील काही दिवसांपासून पाण्याखाली गेला आहे.