नवी दिल्ली - महापुरामुळे बिहारमधील परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. रविवारी पुन्हा पूरस्थिती गंभीर झाली असून आणखी 87 हजार लोक बाधित झाले आहेत. राज्यात महापुराचा एकूण 74 लाख लोकांना फटका बसला आहे, तर आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
बिहारमधील पूर परिस्थिती गंभीर; 16 जिल्ह्यातील 74 लाख लोकांना फटका - बिहार पूर परिस्थिती
महापुरामुळे बिहारमधील परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. राज्यात महापुराचा एकूण 74 लाख लोकांना फटका बसला आहे, तर आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
16 जिल्ह्यातील 125 ब्लॉकमधील 1 हजार 232 ग्रामपंचायतींमध्ये महापूर आहे. महापुराचा सर्वात जास्त फटका दरभंगा आणि मुझफ्फरपूरला बसला असून येथील 34 लाख लोक प्रभावित झाली आहेत, तर दरभंगात पूर-संबंधित घटनामध्ये 9, मुझफ्फरपूर 6, पश्चिम चंपारण 4, आणि सारण व सिवान जिल्ह्यात प्रत्येकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
सीतामढी, शीओहर, सुपौल, किशनगंज, दरभंगा, मुझफ्फरपूर, गोपाळगंज, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, खगेरिया, सारण, समस्तीपूर, सिवान, मधुबनी, मधेपुरा आणि सहरसा ही 16 पूरग्रस्त जिल्हे आहेत. एनडीआरफच्या 20 आणि एसडीआरएफच्या 13 टीमने संयुक्त बचाव मोहिमेदरम्यान आतापर्यंत पूरग्रस्त भागातून एकूण 5.08 लाख लोकांना बाहेर काढले आहे. दरम्यान, राज्यातील विविध ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान, आज दिल्लीसह देशातील बर्याच राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे