नवी दिल्ली - बिहारमधील निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी बिहारमधील मतदारांसोबतच देशवासियांचे आभार मानले आहेत. बिहार सर्वात खास आहे. बिहारमध्ये सत्य जिंकलं आहे, बिहारमध्ये विश्वास जिंकला आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास हेच बिहार विजयाचे रहस्य आहे. नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली बिहारचा विकास करू, असे म्हणत मोदींनी मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.
धन्यवाद बिहार कार्यक्रमात संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी बिहारसह देशातील जनतेचे आभार व्यक्त केले. मोदींनी म्हटले, की देशचा विकास, राज्याचा विकास हेच लक्ष्य आहे व येणाऱ्या निवडणुकांतही हाच मुद्दा राहणार आहे. हे ज्या लोकांना समजले नाही, त्यांची यावेळीही डिपॉझिट जप्त झाली.
पीएम मोदींनी म्हटले, की २१ व्या शतकाच्या भारतीय नागरिक वेळोवेळी आपला स्पष्ट संकेत देत आहेत. आता सेवेची संधी त्यालाच मिळेल जे देशाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत. सर्व राजकीय पक्षांकडून जनतेला हीच अपेक्षा आहे.
गरीब महिला व शेतकऱ्यांचा भाजपवर विश्वास -
मोदींनी म्हटले, की बिहार निवडणुकीसाठी भाजप व एनडीएला मोठा जनाधार मिळाला आहे. यासाठी मोदींनी भाजपा, एनडीएच्या लाखों कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी जनता, निवडणूक आयोग, सुरक्षा दल, स्थानिक प्रशासन अभिनंदनास पात्र आहेत. पंतप्रधान म्हणाले, की कोरोनाच्या या संकट काळात निवडणुका घेणे सोपे काम नव्हते. परंतु आपली लोकशाही व्यवस्था इतकी सशक्त आणि पारदर्शी आहे, की या संकट काळातही विधानसभा निवडणुका घेऊन भारताच्या ताकदीची ओळख करून दिली आहे. देशातील युवक, महिला, गरीब, शेतकरी, मध्यम वर्गाचा भाजपला विश्वास आहे.
दिल्लीमधील कार्यालयात सेलिब्रेशन करण्यासाठी कार्यकर्त्यांना तुफान गर्दी केली. यावेळी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित आहेत. बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून १२५ जागांवर विजय मिळाला आहे.
मोदी म्हणाले, लोकशाहीबद्दल भारतीयांचा जो विश्वास आहे तो जगात कुठेही पहायला मिळत नाही. विजय, पराभव आपल्या जागी आहे पण निवडणूक प्रक्रिया सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे. आधी बिहारमध्ये निवडणूक झाली की किती मतदारसंघ लुटले, किती ठिकाणी पुन्हा मतमोजणी होणार अशा बातम्या येत असत. पण आता मतदान किती वाढलं अशा बातम्या येतात. एकाही मतदान केंद्रावर पुन्हा मतमोजणी झालेली नाही ही देशाची ताकद आहे.