पटना - बिहार राज्यात पावसाचा कहर सुरूच असून विविध घटनेत आत्तापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून एनडीआरएफद्वारे मदतकार्य सुरू असून विविध ठिकाणी १९ पथके कार्यरत करण्यात आली आहेत.
हेही वाचा -'काश्मीरमधील लोकांवर बंधने नाहीत, विरोधक चुकीची माहिती देताहेत'
पटनामधील पूरग्रस्त भागामध्ये औषधे आणि खाद्यपदार्थांची पाकिटे पोहचवण्यासाठी बिहार सरकारकडून भारतीय हवाई दलाकडे दोन हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. तसेच डीवॉटरिंग मशीनचीही मागणी करण्यात आली आहे. १९ एनडीआरएफ पथकांसह इतर बचाव पथकांच्याद्वारे बचावकार्य सुरू आहे. रविवारी पटनामधील सखल भागात अडकून पडलेल्या २३५ लोकांना एनडीआरएफद्वारे सुरक्षितस्थळी दाखल करण्यात आले. तसेच बिहारमधील इतर भागांमधून ४९४५ लोकांना ४५ जनावरांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.
हेही वाचा -कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारचे मोठे निर्णय...
केंद्रीय गृहमंत्रालय उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमधील पाऊस आणि पूरपरिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. गृहमंत्रालय बिहार प्रशासनाच्या संपर्कात आहे. राज्य सरकारने मागणी केल्यास एनडीआरएफची आणखी पथके बिहारमध्ये देण्यात येतील, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले.