नवी दिल्ली - अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान सुरू आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे उमदेवार जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. मागील निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष पदासाठी हिलरी क्लिंटन यांना मतदारांनी नाकारले होते. यावेळेस भारतीय-अमेरिकन, आफ्रिकन- अमेरिकन आणि दक्षिण आशियायी वंशाच्या कमला हॅरिस यांना मतदार पसंती देतील का? हे निकालनंतर स्पष्ट होणार आहे. जो बायडेन आणि कमला हॅरिस यांची जिंकण्याची शक्यता ९० टक्के असल्याचे मत कमला हॅरिस यांचे भारतातील मामा डॉ. जी. बालचंद्रन यांनी व्यक्त केल आहे.
२०१६ आणि आताची स्थिती वेगळी
डॉ. जी. बालचंद्रन हे माजी पत्रकार आणि उच्चशिक्षित आहेत. त्यांनी ईटीव्ही भारतच्या वरिष्ठ पत्रकार स्मीता शर्मा यांच्याशी दिल्लीत चर्चा केली. '२०१६ ची आणि आताची स्थिती वेगळी आहे. राजकारणात नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल अनेकांना काहीही माहिती नव्हती. तसेच २०१६ ला डेमोक्रॅटिक पक्षाच्या कामगार वर्गासंबधीच्या काही धोरणांबाबत जनतेत नाराजी होती. त्यामुळे तेव्हाची स्थिती वेगळी होती. ट्रम्प यांनी निवडून आल्यानंतर भरीव असे काहीही केले नाही. कोरोना महामारी तर ट्रम्प यांचे सर्वात मोठे अपयश आहे, असे डॉ. बालचंद्रन म्हणाले.
तामिळनाडूतील मूळ गावी विजयासाठी प्रार्थना
'कमला हॅरिस यांच्या यशाचा कुटुंबीयांना मोठा अभिमान आहे. मात्र, त्यांच्या आईकडील जवळचे नातेवाईक विविध देशांमध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे निकालानंतर एकत्र आनंदोत्सव साजरा करता येणार नाही. मात्र, कमला यांच्या विजयासाठी तामिळनाडूतील मूळ गावी प्रार्थनेचे आयोजन करण्यात आल्याचे बालचंद्रन यांनी सांगितले.
नागरी हक्कांसाठी कमला हॅरिस कायमच जागरुक
कमला हॅरिस या कार्यक्षम लोकनेत्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्या अमेरिकेतील सर्वात मोठ्या कॅलिफोर्निया राज्याच्या महाधिवक्त्या होत्या, त्यानंतर त्यांनी सिनेटर पदापर्यंत मजल मारली. या २० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांच्यातील सामर्थ्य दिसून येत असल्याचे बालचंद्रन म्हणाले. नागरी हक्क आणि आफ्रिकन अमेरिकन मोहिमांबाबत कमला हॅरिस लहानपणापासून जागरुक आहे. त्या काळात नागरी हक्क मोहिमेत कोणी भारतीय महिलेने सहभागी होणे क्वचितच दिसत असे. कमला आफ्रिकन अमेरिकन समाजात वाढली आहे. त्यामुळे या लोकांसाठी कायदे आणि धोरण आखण्यात त्या मोलाचा सहभाग देऊ शकतात, असे बालचंद्रन म्हणाले.
६० ते ७० टक्के अमेरिकन भारतीय बायडेन यांच्या बाजूने
बालचंद्रन यांची मुलगी श्रद्धा बालचंद्रन अमेरिकेतील वॉशिंग्टनमधील मेरिलँड विद्यापीठात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात श्रद्धा आणि कमला हॅरिस बरोबर आहेत. अमेरिकेत राहणारे भारतीय वंशाचे नागरिक डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक समजले जातात. या निवडणुकीत त्यांचा कल कोणाकडे असेल, असे विचारले असता बालचंद्रन म्हणाले, काही जणांना ट्रम्प आणि मोदी चांगले मित्र वाटतात. त्यामुळे कदाचित ते ट्रम्प यांच्या बाजूने झुकलेले असू शकतात. मात्र, सर्वांगीन विचार करता ६० ते ७० टक्के भारतीय बायडेन यांचे समर्थक असल्याचे ते म्हणाले.
२०२४ ला राष्ट्राध्यक्षपदासाठी दावेदार
कमला हॅरिस म्हणजेच आपल्या भाचीला बालचंद्रन यांनी निवडणूकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी त्यांनी कमला हॅरीस यांच्या उमेदीच्या काळातील काही आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, कमला जेव्हा अमेरिकेत जिल्हा अधिवक्ता पदाच्या निवडीसाठी उभी राहीली होती, तेव्हाच तिच्यात राजकारणात यश मिळविण्याची ताकद असल्याचे दिसले होते. मृत्यू दंडांच्या शिक्षेविरोधातही कमला निर्धाराने उभी राहिली होती. अमेरिकेच्या इतिहासातील पहिली महिला उपाध्यक्ष होण्यासाठी ती आशावादी आहे. तसेच २०२४ च्या निवडणुकांत राष्ट्राध्यक्षपदासाठी उभे राहण्याची कमला हॅरीस यांची शक्यता वाढली आहे. मात्र, आता जनता कोणाला निवडून देणार हा मोठा प्रश्न असल्याचे बालचंद्रन म्हणाले.