नवी दिल्ली - भिवंडी धामणकर नाका परिसरात असलेल्या पटेल कंपाउंडमधील जिलानी नामक ३ मजली इमारतीचा अर्धा भाग सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक कोसळला. यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला. तर ७ गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार आहेत. पहाटे सगळे गाढ झोपेत असतानाच इमारत जमीनदोस्त झाली. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्याप बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, या घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले आहे.
भिवंडीमध्ये इमारत दुर्घटनेत जी जीवितहानी झाली ती वेदनादायी आहे, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी जखमी झालेले लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत त्यातील मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणारे ट्विट केले आहे. जखमी झालेले लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी पीडितांसाठी सर्व मदत केली जात असल्याचे म्हटलं आहे.