महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जल संवर्धनाचा 'भिडूकी पॅटर्न'; पाहा पंतप्रधानांनी कौतुक केलेल्या गावाची यशोगाथा... - भिडूकी जल संवर्धन बातमी

पाण्याचे महत्त्व लक्षात घेत हरियाणा राज्यातील पलवल जिल्ह्यातील 'भिडूकी' या गावाने जल संवर्धन उपक्रम राबवत संपूर्ण देशासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

Bhiduki Panchayat
जल संवर्धनाचा 'भिडूकी पॅटर्न'

By

Published : Jul 29, 2020, 4:23 AM IST

Updated : Jul 29, 2020, 2:47 PM IST

पलवल(हरियाणा)- पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, हे अनेकवेळा ओरडून सांगितले जात असले, तरी अजूनही पाण्याचे महत्त्व आपल्याला समजलेच नाही. घरात २४ तास पाणी आहे, म्हणून पाणी जास्त प्रमाणात वापरले जाते. पण, एक दिवस नळाचे पाणी गेले, तरी तोंडचे पाणी पळते. मग महिनोनमहिने दुष्काळी परिस्थितीशी झुंजत असलेल्या, पाण्यासाठी अक्षरशः दाहीदिशा फिरणाऱ्या लोकांना त्याचे किती महत्त्व असेल. म्हणूनच पाणी जपून वापरले, त्याचे योग्य नियोजन केले तर ज्यांना पाणी मिळत नाही, अशा व्यक्तींच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो हे लक्षात घ्यायला हवे.

दरम्यान, पाण्याचे महत्त्व लक्षात घेत हरियाणा राज्यातील पलवल जिल्ह्यातील 'भिडूकी' या गावाने जल संवर्धन उपक्रम राबवत संपूर्ण देशासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या गावाच्या 'जल संवर्धन' उपक्रमाचे 'मन की बात'मध्ये कौतूक केले आहे.

जल संवर्धनाचा 'भिडूकी पॅटर्न'...

पलवल जिल्ह्यातील भिडूकी गावात काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. गावात पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे गावात पाणी साचत असे. या गावात सरकारी मुलींची शाळा आहे, पावसाळ्यात शाळेत जाणारा मार्गही अस्वच्छ पाण्याने भरला जात असे. शाळेच्या मैदानावरही पावसाचे पाणी साचत असे. पावसाळ्यात प्रत्येक वर्षी ग्रामस्थांना या समस्येचा सामना करावा लागत होता.

सरपंच सत्यदेव गौतम यांचा पुढाकार -

सन 2016 मध्ये भिडूकी गावाने सत्यदेव गौतम यांच्या खांद्यावर सरपंच पदाची धुरा दिली. सत्यदेव गौतम यांचे बी.टेक आणि एमबीएचे शिक्षण झाले आहे. लाखो रुपयांच्या पॅकेजसह नोकरी सोडून त्यांनी आपल्या गावाचे चित्र बदलण्याचे स्वप्न पाहिले होते.

गावातील शाळेत बसवले वॉटर हार्वेस्टिंग प्लांट -

सरपंच सत्यदेव गौतम यांनी सर्वप्रथम आपल्या गावातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यास सुरुवात केली. सत्यदेव गौतम यांनी सरकारी शाळेत वॉटर हार्वेस्टिंग प्लांट बसवला. सरपंचांनी शाळेच्या इमारतीच्या गच्चीवर पाणी साचण्यासाठी पाईप टाकले, रस्ता व त्या परिसरातील पाण्याचा साठा नाल्याद्वारे जोडला. शाळेच्या एका भागात सुमारे तीन फूट रुंदी आणि दहा फूट लांबीच्या तीन टाक्या बनवल्या. ते साठलेले सर्व पाणी या टाक्यांमध्ये सोडवले जाते.

जल संवर्धन कसे केले जाते -

तलावाच्या ओव्हरफ्लो पाण्यामधून सिंचनाचा वापर करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते पाणी नाल्याद्वारे शेतात आणले जाते. यासाठी, तलावाच्या पाण्याची पातळी निश्चित केली जाते आणि तेथील पाणी सुमारे दोन किलोमीटरच्या सीव्हर लाईनमधून मॅन होलमध्ये सोडले जाते. तेथून पाणी शुद्ध होईल व शेतात सिंचनासाठी नाल्यापर्यंत ते पाणी पोहचवले जाते. त्यामुळे तलावातील ओव्हरफ्लो झालेले पाणी रस्त्यावर वाया न जाता त्याचा उपयोग शेतीसाठी केला जाऊ लागला आहे.

तलावापासून ते सिंचन नाल्यापर्यंत दोन किलोमीटर लांबीच्या मार्गामध्ये दर 300 फूट अंतरावर एकूण 15 मॅन होल बांधले आहेत. ज्यामधून पाणी स्वच्छ होईल आणि पुढे जाईल. जर एखाद्या शेतकर्‍याला आपल्या शेताला पाणी द्यायचे असेल तर, मॅन होलमध्ये पाईप टाकून तो शेतापर्यंत घेऊन जाऊ शकतो. अशाप्रकारे अनेक छोट्या तलावांचे खोदकाम सध्या सुरू असल्याची माहिती सरपंच सत्यदेव गौतम यांनी दिली. या उपक्रमामुळे परिसरातील जमिनीतील पाणीपातळी वाढली असून, याचा फायदा पुढील पिढ्यांसाठी होणार असल्याचेही सरपंच गौतम यांनी सांगितले.

हरजीन वस्तीवरही बसवले वॉटर हार्वेस्टिंग प्लांट -

सरपंच सत्यदेव गौतम यांच्या पुढाकाराने गावातील हरजीन वस्तीमधील सुमारे 40 घरांसाठी वॉटर हार्वेस्टिंग प्लांट बसवण्यात आले आहेत. पूर्वी पाण्याचा निचरा होत नसल्याने या घरांसमोर पाणी साचले जायचे, परंतु आता येथे पाणी उपसा प्रकल्पही बसवण्यात आला आहे.

तलावांना शेताशी केले कनेक्ट -

वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्टसोबतच सरपंच सत्यदेव गौतम यांनी गावालगतच्या भागात अनेक छोटे-छोटे तलाव तयार केले आहेत. हे तलाव थेट शेताशी जोडले आहेत. यामुळे तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते पाणी वाया न जाता त्याचा फायदा शेतीसाठी केला जात आहे.

पंतप्रधानांनी केले कौतुक -

भिडूकी गावाने केलेल्या जल संवर्धन उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून तोंडभरून कौतूक केले आहे. तसेच या गावचे सरपंच सत्यदेव गौतम यांचे अभिनंदन देखील केले आहे.

दरम्यान, भिडूकी गावाने वर्षा जलच्या माध्यमातून केलेले जल संवर्धन नक्कीच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. याचा प्रसार होणे गरजेचे असून, यामुळे देशातील अनेक गावांना याचा फायदा होईल...

Last Updated : Jul 29, 2020, 2:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details