रांची -झारखंड विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. बुधवारी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये राज्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबांतील एका सदस्याला रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री अर्जून मुंडा, मुख्यमंत्री रघुबर दास उपस्थित होते.
भाजपच्या जाहिरनाम्यातून...
- कृषी आशीर्वाद योजनेचा विस्तार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना 5 हजार रुपये देणार.
- राज्यात कृषी विमा योजना सुरू करणार.
- 2020 पर्यंत नवीन एकलव्य विद्यालयाची निर्मिती करणार.
- सर्व जातीय विद्यार्थांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोफत वसतिगृहाची निर्मिती करणार.
- भविष्यातील रोजगार संधी ओळखून उद्यमशीलतेला पुरेपूर वाव देण्यासाठी येत्या 5 वर्षांमध्ये सरकारच्या वेगवेगळ्या कौशल्य कार्यक्रमाच्या माध्यमातून 20 लाख युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार.
- प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 मेगा कौशल्य केंद्राची स्थापना करणार.
- झारखंडला नक्षलमुक्त राज्य केले जाईल. तसेच घुसखोरीची समस्या रोखण्यासाठी झारखंडमध्ये एनआरसी राबविण्यात येणार आहे.
- सरकारी शाळा आणि महाविद्यालयांसाठी 1 हजार कोटींचा विशेष निधी तयार करून त्यांचे आधुनिकीकरण करण्यात येईल.
- क्रीडा, प्रशिक्षक व क्रीडा व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणासाठी क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार.
- आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदक प्राप्त करणाऱ्या व्यक्तींना वयाच्या 60 व्या वर्षांनंतर निवृती वेतन देण्यात येईल.
- राज्यातील महिलांना सरकारी सेवांमध्ये 33% आरक्षण देईल.
- अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांचा आढावा घेण्यासाठी 3 महिन्यांत एक समिती स्थापन करण्यात येईल आणि त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.