नवी दिल्ली -विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या भर्तीसाठी लागू करण्यात आलेल्या १३ पॉइंट रोस्टर विरोधात, अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय समुदायाने भारत बंदची हाक दिली होती. या बंदचा मोठा परिणाम उत्तर भारताच्या अनेक राज्यांमध्ये पाहण्यास मिळाला. देशाची राजधानी दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात युवक रस्त्यावर उतरले होते. तर, अनेक मोठ्या पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दर्शवला.
विद्यापीठांच्या प्राध्यापक भर्ती प्रक्रियेत १३ पॉइंट रोस्टर लागू झाल्यामुळे मागास जातींच्या आरक्षणाला फूस लावली जात आहे. तर, केंद्रातील मोदी सरकार या समुदाचे आरक्षण रद्द करण्याच्या तयारीत आहे, असा ठपका आंदोलकांनी ठेवला आहे. बंदच्या वेळी कोणत्याही अप्रिय घटनेची बातमी समोर आली नाही. मात्र, अनेक राज्यांमध्ये आंदोलकांनी रेल्वे गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. तर, बिहारमध्ये काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
काय आहे प्रकरण -
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्राध्यापकांच्या भर्तीसाठी २०० पॉइंट रोस्टर रद्द करून १३ पॉइंट रोस्टरची तरतूद केली होती. यावर मागास समुदायाने आक्षेप नोंदवत अलाहबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाने यूजीसीच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. तेथेही १३ पॉइंट रोस्टरच बरोबर असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. तेव्हापासून १३ पॉइंट रोस्टर रद्द करण्याची मागणी मागास समुदाय करत आहे.