चंदीगड -तुम्ही बेवफा सनम, बेवफा आशिक असे प्रकार ऐकले असाल. मात्र, कधी 'बेवफा चायवाला' ऐकलाय? नाही, हा राजकीय टोला नाही. किंवा, हा कोणी धोकेबाज चहावालाही नाही. तर हे आहे, हरियाणामधील एका चहाच्या दुकानाचे नाव.
हरियाणाच्या सोनिपतमध्ये हा 'बेवफा चायवाला' बराच प्रसिद्ध आहे. या चहाच्या दुकानाचे वैशिष्ट्य म्हणजे, इथे प्रेमी जोडप्यांना आणि प्रेमाच्या बाबतीत कमनशिबी ठरलेल्या लोकांना वेगवेगळ्या दरात चहा मिळतो.
असा आहे दर..
प्रेमात 'धोका' मिळालेल्या लोकांना इथे २५ रुपयांना चहा मिळतो. मात्र, प्रेमी जोडप्यांना इथे २० रुपयांना एक कप चहा मिळतो. तुम्ही सध्या कोणासोबततरी रिलेशनशिपमध्ये असाल, आणि तुम्ही तिथे एकटे गेलात, तरीही तुम्हाला २० रुपयांनाच चहा मिळतो हे विशेष!
दरम्यान, देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना इथे पूर्णपणे मोफत चहा दिला जातो. तसेच, दुकानात मिळणारे इतर खाद्य पदार्थ मोफत घरपोच सेवाही दिली जाते. इथे एसीमध्ये बसण्याची सुविधाही आहे, हे विशेष!