बंगळुरू : कर्नाटकच्या बेळगावमध्ये कोरोनावरील कोव्हॅक्सिन लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करण्यात आली आहे. भारत बायोटेकने बनवलेली ही पूर्णपणे स्वदेशी कोरोना लस आहे. यापूर्वीच्या दोन्ही टप्प्यातील चाचण्या यशस्वीपणे पार पडल्यानंतर आता तिसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.
७८० जणांना देण्यात येणार लस..
या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ही लस ४ स्वयंसेवकांना देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५० स्वयंसेवकांना ही लस दिली गेली. आता या टप्प्यामध्ये ७८० स्वयंसेवकांना ही लस देण्यात येणार आहे. आतापर्यंत ही लस देण्यात आलेल्या कोणावरही कोणतेही दुष्परिणाम आढळून आले नाहीत. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणही येत्या चार-पाच दिवसांमध्ये पार पडेल. देशभरातील १२ रुग्णालांमध्ये या चाचण्या सुरू आहेत. कर्नाटकमध्ये बेळगाव येथील जीवन रेखा रुग्णालयात या चाचण्या सुरू आहेत.