प्रत्येक युद्धात सर्वप्रथम सत्याची शिकार होते आणि दुसरी शिकार होते ती महिलांची, युद्धाने उध्वस्त झालेल्या सीरिया, इराक, येमेन आणि अफगाणिस्तानच्या महिला याचे प्रतिक आहेत.
प्रमुख राजकीय तत्वज्ञानाच्या कोसळलेल्या अवशेषांच्या ढिगाऱयाखाली त्यांच्या दैन्यावस्थेची मूक कहाणी गाडली गेली आहे. तरीही काही महिला धार्मिक आणि राजकीय उपदेशासाठी असलेली स्वतःची असुरक्षितता ओळखतात आणि सुरक्षा आणि स्वातंत्र्याकडे स्वतःचा मार्ग शोधून जातात.
एकेकाळी तालिबानच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानच्या भागांमध्येही हे स्पष्टपणे दिसते. काही प्रांत वगळता, संपूर्ण अफगाणिस्तानात, विशेषतः पाकिस्तानला लागून असलेल्या प्रांतांमध्ये महिलांनी त्यांच्या इच्छेविरूद्ध जगण्याची आदिम शैली स्विकारल्याचे पहायला मिळते. मध्य पूर्व देशांमध्येही हीच परिस्थिती होती. या प्रदेशांतील महिलांना पुरूष जे स्वातंत्र्य आणि अधिकार भोगतात, तशी समान संधी देणारी संस्कृती स्विकारायला आवडेल परंतु लोकप्रिय राजवटींनी त्यांना मुक्त जीवनशैली कधीच मान्य केली नाही.
बहुसंख्य महिलांना, अज्ञानातून, असे वाटत असते की, त्यांची जी जीवन जगण्याची पद्घती आहे ती श्रद्धेचा भाग आहे. आपल्यासाठी जे हक्क आहेत. ते इस्लामी न्यायशास्त्रानुसार असमान असून वेगळ्या शरीरशास्त्रानुसार आहेत. हा एक वादाचा मुद्दा होऊ शकतो. मात्र, या हास्यास्पद विश्वासाचा स्विकार त्यांच्यासाठी श्रद्घा बनली आहे आणि यातच महिला अनेक दशके आणि शतकांपासून रहात आल्या आहेत.
पुरूषांना आपली जोडीदार निवडण्याची परवानगी होती आणि महिलांना पितृसत्ताक कुटुंब पद्धतीकडून मंजुरी मिळवावी लागत असे. पुरूष आपल्या भावना व्यक्त करत, महिलांना आपल्या भावना आतल्याआत ठेवाव्या लागत. पापाच्या व्याख्येलासुद्घा अनेक आयाम आणि अर्थ होते. पुरूषांकडून पाप झाले तर, वेगळी किमत चुकवावी लागत असे आणि महिलांनी ते केले तर त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होत असे.
गेल्या दोन दशकांत या नमुन्यात, युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील महिलांना सर्वाधिक तडाखा बसला आहे. तालिबानच्या राजवटीत महिलांना आपले कुटुंब पोसण्यासाठी नोकरीची संधी क्वचितच मिळत असे. त्या सहशिक्षणासाठी शाळेतही जाऊ शकत नसत. आपले विचार बाहेर व्यक्त करण्यासाठी जो काही अवकाश त्यांना होता तो निषिद्ध होता. चेहराच नव्हे तर महिलांचा आवाजही अनोळखी व्यक्तींपासून (गैर मुहारिम) दूर ठेवावा लागत असे.
अरब जगतातील महिलांबाबतही अशीच परिस्थिती होती. अगदी आणिबाणीच्या परिस्थितीतही, महिलांना आपले कुटुंब बाहेर काढून न्यायची परवानगी नसे. या वंचित अवस्थेतून क्रांति अटळच होती आणि परिवर्तन घडायलाच हवे होते.
आधुनिक साहित्यातील व्यक्तिवादाची कल्पना आणि सांस्कृतिक इस्लामच्या आधुनिक अर्थ लावण्यातून या क्षेत्रांत अनेक दशकांपासून महिलांना ज्या बेड्या घातल्या होत्या, त्या तोडण्यास मदत झाली. त्यांच्या दैन्यावस्थेला काही अंशी पितृसत्ताक जबरदस्तीच्या पद्घती जबाबदार होत्या तसेच काही प्रमाणात त्यांचा स्वतःचा विरोध न करण्याचा पवित्राही कारण होता.
माहितीचा संकुचित आणि मर्यादित ओघ मोठ्या प्रमाणात परिवर्तनाला अटकाव करणारा ठरला. युद्धामुळे विरोधाभास असा झाला की, लोकसंख्येचे स्थलांतर झाले आणि त्यामुळे सनातनी जीवनपद्घतीकडून नव्या भागांमधील नव्या जीवनशैलीकडे वळावे लागले. तरीसुद्घा, काही लोकांनी स्थलांतर करण्याचा पर्याय स्विकारला नाही आणि त्यांच्या स्वतःच्या मायभूमीतच परिवर्तन आणताना, बदलाला विरोध करणाऱया सर्व शक्तींना आव्हान दिले.