श्रीनगर : गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास ४५ वर्षीय कौसर रियाझ आणि त्यांचा मुलगा अकीब हे गाडीतून आपल्या बेकरीकडे जात होते. तेव्हा त्यांना समोर सुरक्षा दलाचे जवान दिसले. मोठ्या प्रमाणात जवान दिसल्यामुळे कौसर यांनी मुलाला गाडी मागे वळवण्यास सांगितली. त्याने गाडी परत फिरवताच, मागून त्यांच्या गाडीवर गोळीबार झाला ज्यातील एक गोळी कौसर यांना लागून त्यांचा मृत्यू झाला.
रक्तबंबाळ अवस्थेतील आपल्या आईला पाहून अकीबने गाडी थांबवली, तेव्हा कौसरच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गोळी लागल्याचे त्याच्या लक्षात आले. "माझ्या आईला गोळी लागलेली पाहताच मी तेथील पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. मात्र, त्यांनी यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला कंट्रोल रुमकडे नेले, जिथे मी स्वतः माझ्या आईला उचलून गाडीतून बाहेर काढले. पोलिसांनी तिला कंट्रोल रुममध्ये आणल्यानंतर मृत घोषित केले. खरेतर, तिचा गोळी लागून जागीच मृत्यू झाला होता." असे २५ वर्षांच्या अकीबने ईटीव्ही भारतला सांगितले.
कौसरचे कुटुंबीय या परिसरात एक बेकरी चालवतात. सकाळी लवकर पाव बनवण्यासाठी दररोज ते याच सुमारास बेकरीमध्ये जातात. अकीबचे ३१ ऑगस्टला लग्न झाले होते. त्यानंतर ते आपल्या नव्या घरातही शिफ्ट झाले होते. सलग दोन आनंददायी घटनांनंतर आता कौसरचे नातेवाईक पुन्हा एकदा त्यांच्या घरी जमा झाले आहेत; मात्र यावेळी कौसरच्या दुर्दैवी मृत्यूच्या निमित्ताने...
दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या बाटमालू भागामध्ये सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्याच कौसरची ही कथा आहे. ही घटना घडली तेव्हा कौसरचे पती श्रीनगरच्या रुग्णालयात रात्रपाळीत काम करत होते. विशेष म्हणजे, घटनेला दोन दिवस उलटून गेले, तरी कौसरचा मृतदेह अजूनही पोलिसांनी कुटुंबीयांकडे सोपवला नाही. परिस्थिती तणावाची असल्याचे कारण पुढे करत पोलीस कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप कौसरच्या कुटुंबीयांनी केला आहे. यासोबतच, कौसरचा मृत्यू चकमकीमध्ये चुकून झाला नसून, त्यांना लक्ष्य करण्यात आले असल्याचा आरोपही कुटुंबाने केला आहे.
विशेष म्हणजे, असाच दावा बशीर अहमद खानच्या कुटुंबीयांनीही केला आहे. बशीर हे ६५ वर्षीय नागरिक होते. १ जुलैला एका दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. बशीर यांना गाडीतून बाहेर काढून मारण्यात आले होते, असा दावा त्यांचे कुटुंबीय करत आहेत. सुरक्षा दलांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे.
चकमकीत पोलिसच करतायत नागरिकांच्या घरातील रोकड लंपास..?