मथुरा - एकीकडे महाराष्ट्र राज्यात मंदिरे उघडण्यासाठी परवानगी द्या, असे भाजपा सांगत आहे. त्यासाठी भाजपाने आंदोलने देखील केली. तर दुसरीकडे भाजपाची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश राज्यात मंदिरं बंद करण्यात येत आहेत. यामुळे भाजपाच्या दुटप्पी धोरणावर सर्वजण टीका करताना दिसत आहेत.
उत्तर प्रदेशच्या वृंदावन येथील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिर पुन्हा बंद करण्यात आलं आहे. भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने जिल्हा प्रशासन आणि मंदिर प्रशासनाने मंदिर अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १७ ऑक्टोबरला ऑनलाइन रजिस्ट्रेशनद्वारे भक्तांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. तरी देखील मंदिरात भक्तांच्या गर्दीत वाढ होत असल्याने, हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनामुळे २२ मार्चला वृंदावन येथील बांके बिहारी मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर अनलॉकमध्ये १७ ऑक्टोबरला हे मंदिर खुलं करण्यात आले होते. पण दिवसागणिक मंदिरात भक्तांची गर्दी वाढत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. या कारणाने हे मंदिर पुन्हा बंद करण्यात आले आहे.