नवी दिल्ली - मध्यप्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना मध्यप्रदेशमधून बाहेर हलवत कर्नाटक आणि हरियाणामध्ये ठेवले आहे. काँग्रेस आमदारांना भेटण्यासाठी गेलेल्या मध्यप्रदेशच्या 2 मंत्र्यांना मारहाण झाल्याचा आरोप मध्यप्रदेश काँग्रेसने केला आहे. तसेच यासंबधित व्हिडिओही त्यांनी टि्वट केले असून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
मध्यप्रदेश सत्तासंघर्ष : मध्यप्रदेश सरकारच्या 2 मंत्र्यांना बंगळुरूमध्ये मारहाण, काँग्रेसचा आरोप - भाजपने काँग्रेसेच आमदार पळवले
काँग्रेस आमदारांना भेटण्यासाठी गेलेल्या मध्यप्रदेशच्या 2 मंत्र्यांना मारहाण झाल्याचा आरोप मध्यप्रदेश काँग्रेसने केला आहे. तसेच यासंबधित व्हिडिओही त्यांनी टि्वट केले आहेत.
राजीनामा दिलेल्या काँग्रेस आमदारांना भेटण्यासाठी मध्यप्रदेश सरकारचे नेते जीतू पटवारी आणि लाखन सिंह बंगळुरुला गेले होते. त्यावेळी त्यांना मारहाण झाल्याचा दावा मध्यप्रदेश सरकारने पत्रकार परिषदेत केला आहे. दोन्ही मंत्र्याना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी कारवाई करत काँग्रेस मंत्री आणि आमदारांची सुटका केली नाही, तर आम्हाला न्यायालयात जावे लागेल, असे मध्यप्रदेश सरकारने पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.
ज्योतिरादीत्य यांचे समर्थक बंडखोर काँग्रेस आमदारांना मध्यप्रदेशच्या बाहेर बंगळुरूमधील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. याठिकाणी आमदारांच्या सुरक्षेसाठी कमांडो तैनात करण्यात आले आहेत. सभागृहातील बहूमत चाचणीवेळीच त्यांना भोपाळला नेण्यात येणार असल्याची माहिती आहे.