बंगळुरु- कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचे ७० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शाळा महाविद्यालयासह सिनेमागृहेही अनेक राज्यांनी बंद ठेवली आहे. मात्र, कोरोनाचा फटका आता बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही बसायला लागला आहे. बंगळुरुमधल्या गुगल कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर ऑफिस बंद ठेवण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे.
'बंगळुरु कार्यालयातील आमच्या एका कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोनाची लक्षण दिसण्याआधी काही तास तो कार्यालयामध्ये होता. आता त्याला अलिप्त ठेवण्यात आले आहे, अशी माहिती गुगल कार्यालयाने दिली. कोरोनाच्या प्रसारामुळे आम्ही कर्मचाऱ्यांना उद्यापासून घरूनच काम (वर्क फ्रॉम होम) करण्याचे सांगितले आहे. आरोग्य विभागाच्या आदेशानुसार आम्ही योग्य ती काळजी घेत राहू, असेही गुगलने स्पष्ट केले आहे.